गणेशमूर्ती घरीच विसर्जन करण्यासाठी संजोग वाघेरे व उषा वाघेरे यांची अनोखी संकल्पना

पिंपरी, दि. २५ – करोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर शहरामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन घाटावर करण्यास बंदी आहे. महापालिकेच्या वतीने नागरिकांना घरामध्येच गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र पालिका प्रशासनाकडून नागरिकांकडे मूर्ती विसर्जन करण्यासाठी सोय उपलब्ध केली नाही. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील नगरसेविका उषा वाघेरे पाटील यांनी अमोनियम बाय कार्बोनेट पावडर वाटप करून घरच्या घरी गणपती विसर्जन करण्याची संकल्पना राबविली आहे.

दरवर्षी महापालिकेच्या वतीने गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी घाटावर सोय केली जाते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे गर्दी टाळण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाने केले. मात्र याची तयारी पालिका प्रशासनाने मूर्ती विसर्जनासाठी घाटावर कोणतीही व्यवस्था केली नाही. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पिंपरी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी ही संकल्पना राबविली आहे. एकीकडे पालिका प्रशासनाकडून गणेश भक्तांच्या भावना दुखावल्या असताना तत्परता दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस धावून आल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात आले.

याबाबत बोलताना संजोग वाघेरे पाटील म्हणाले, आपल्या सर्वांच्याच उत्सवावर यंदा करोनाचे सावट आहे. त्यामुळे सण साध्या पद्धतीने मात्र भक्तीभावाने साजरा करायचा आहे. मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कोणत्याही नागरिकाची गैरसोय होऊ नये यासाठी घरच्या घरी गणेश विसर्जन करण्यासाठी अनोखी योजना तयार केली आहे. यामध्ये नागरिकांनी २० लिटर पाण्यात अमोनियम बायकार्बोनेट पावडर टाकून त्यात गणेश मूर्तीचे विधीवत विसर्जन करावे त्यानंतर दोन दिवसांनी त्यामधील पाणी झाडांना टाकावे व माती झाडासाठी वापरावी यामुळे पर्यावरण वाढीस व सार्वजनिक आरोग्य सांभाळण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शासनाच्या नियमांचेही पालन होईल तसेच आपल्या लाडक्‍या बाप्पाला भक्तीभावाने निरोपही देता येईल.