पाचव्या दिवशी विसर्जन करण्यास गणेश मंडळांचा नकार
लॉकडाऊन अद्याप जाहीर झालेले नाही – सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड
नारायणगाव (किरण वाजगे),
नारायणगाव (तालुका जुन्नर) येथे तहसीलदारांनी तोंडी आदेश दिला असल्याचे कारणावरून लॉकडाऊन होण्याची शक्यता पाहता सर्व घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांनी स्थापन केलेले श्री गणेशोत्सवाची मूर्ती पाचव्या दिवशी विसर्जन करावी असे आवाहन नारायणगाव ग्रामपंचायत व पोलीस स्टेशनच्या पत्राद्वारे करण्यात आले आहे. याबाबत सोशल मीडियावर देखील काही जणांकडून मेसेज व्हायरल करण्यात येत आहे.
यामुळे अनेक गणेश मंडळांना याबाबत पूर्ण माहिती नसल्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झाली होती. आज नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये सायंकाळी आठ वाजता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांची भेट घेण्यासाठी काही गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आले होते.
शासन निर्णयानुसार सध्या सर्वत्र लॉक डाऊन शितील करण्यात आले असल्याचे समजते मात्र नारायणगाव व वारूळवाडी येथे सर्व गणेश मंडळांनी तसेच घरगुती बसवलेल्या गणेशांच्या मूर्तीं चे विसर्जन पाचव्या दिवशी म्हणजेच दिनांक २६ ऑगस्ट रोजी करावे असे आवाहन पत्र नेमक्या कोणत्या आधारावर देण्यात आले आहे याबाबत संभ्रम दूर करण्यात साहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड आज यशस्वी ठरले. त्यांनी सांगितले की, जर तहसीलदार कार्यालयाकडून कंटेनमेंट झोन जाहीर झाला तर दिनांक २७ पासून नारायणगाव व वारूळवाडी येथे लॉक डाउन चालू होऊ शकते. सध्या तरी लॉकडाऊन जाहीर झाला नसल्याचेही श्री गुंड यांनी सांगितले.
दरम्यान आज नारायणगाव पोलिस स्टेशन येथे झालेल्या बैठकीला नारायणगाव येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी तथा अजिंक्यतारा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष गणेश वाजगे, वारूळवाडी येथील गणेश मंडळाचे सुशांत ढवळे, खंडोबा मित्र मंडळाचे प्रशांत उर्फ बाळा खैरे, वाजगे आळी गणेशोत्सव मंडळाचे मुकेश वाजगे, रोहन वाजगे, हनुमान चौक येथील काशिविश्वेश्वर मंडळाचे हितेश कोराळे, मावळेआळी मंडळाचे गणेश शिंदे, अमोल जगदाळे, कृष्णा माने, अश्फाक पटेल, स्वप्नील ढवळे, वारूळवाडी येथील नवशक्ती मित्र मंडळाचे बनकर, मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान प्रशासनाने प्रांत अधिकाऱ्यांकडे लाँकडाऊन करण्याबाबत प्रस्ताव पाठविला असल्याचे समजते. जर प्रांत अधिकारी अथवा तहसीलदारांनी नारायणगाव व वारूळवाडी कंटेनमेंट झोन जाहीर केला तर दिनांक २७ पासून नारायणगाव मध्ये लाँक डाऊन होण्याची शक्यता आहे. आपण श्री गणेश विसर्जना बाबत कोणालाही जबरदस्ती केली नसून दिनांक २७ पासून कंटेनमेंट झोन जर जाहीर झाला तर मात्र नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची शक्यता देखील श्री निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी व्यक्त केली.