भांडवलदारांच्या हातात देशाचे अर्थकारण जात असल्याची भीती – खासदार डॉ. अमोल कोल्हे

नारायणगाव येथे ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राचे उद्घाटन

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
भांडवलदारांच्या हातात देशाचे अर्थकारण जात असल्या मुळे भारत देश आर्थिक दृष्ट्या डबघाईला जात असल्याची भीती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका यांच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नारायणगाव येथे ग्राहक जागरण मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे बोलत होते. यावेळी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्र कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी ग्राहकाची अज्ञानातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी सतर्क राहून ग्राहक मार्गदर्शन सेवा केंद्राची मदत घेण्याचे आवाहन केले.मोजक्या मुठभर उद्योगपतींच्या व भांडवलदारांच्या हातात देशाचे अर्थकारण जात असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. आपण मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला असल्यामुळे कुठल्याही व्यवसायास जोपर्यंत नैतिक अधिष्ठान असते तोपर्यंत व्यापाऱ्याचे अथवा ग्राहकाचे हित बाधित होत नाही. परंतु ज्यावेळी नफेखोरीची नशा लागते तेथे ग्राहक भरडला जातो. नैसर्गिक तेल व वायू , एअरपोर्ट, संरक्षण सामग्रीचे उत्पादन यांचे लिलाव झाले असून त्यात ठराविक खाजगी कंपन्यांचा सहभाग वाढला आहे. ज्यावेळी अनेक उद्योजकांना समान संधी मिळेल तेव्हा संभाव्य होणाऱ्या निकोप स्पर्धेतून देशाचा विकास होईल.

प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे. ग्रामीण भागातील गरीब व शेतकरी कुटुंबाने कष्ट करून आयुष्यभर जमा केलेल्या पुंजीची फसवणूक झाल्यास ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी निश्चित फायदा होईल असे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

केंद्र सरकारने २०१० साली वैद्यकीय अस्थापना कायदा अनेक राज्यात व केंद्रशासित प्रदेशात लागू केलेला आहे. २०१४ ला महाराष्ट्र सरकारने मसुदा तयार केला परंतु ग्राहकांच्या हिताचा हा कायदा अस्तित्वात आला नाही. तसेच उत्पादित मालावर उत्पादन मूल्य छापण्यात यावे तसा कायदा संसदेत आणला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींनी संसदेत मागणी करावी असे विचार अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राज्य संघटक बाळासाहेब औटी यांनी व्यक्त केले. ग्राहक पंचायतीचे परिवहन राज्यप्रमुख ॲड.तुषार झेंडे यांनी ग्राहकांचे अधिकार समजावून सांगितले. व ग्राहकाने आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यास ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून त्याची सोडवणूक करण्यात येईल अशी हमी दिली.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब औटी, मार्गदर्शक ॲड. तुषार झेंडे, सरपंच योगेश पाटे, राष्ट्रवादीचे शहर प्रमुख रोहिदास केदारी, नारखेडे साहेब, देवराम तट्टू, वैशाली अडसरे, भास्कर आहेर, गोरक्ष लामखाडे, कौसल्या फापाळे, शैलेश कुलकर्णी, शांताराम हिंगे, रमेश कोल्हे, गणेश वाजगे, पराग हांडे.अजित वाजगे, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *