मंदिरासमोर एकमेकांना अंडी मारून केला होता वाढदिवस साजरा

सार्वजनिक ठिकाणी वाढदिवस साजरा करणाऱ्या सहा जणांवर नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर व मंदिरासमोर एकमेकांवर अंडी मारून बेकायदेशीररित्या वाढदिवस साजरा करणाऱ्या सहा जणांवर नारायणगाव (तालुका जुन्नर) येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती नारायणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

याबाबत नारायणगाव पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी की, रविवार दिनांक १३ डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताई मंदिरासमोर काही युवकांनी भर रस्त्यावरच वाढदिवस साजरा केला. नारायणगाव येथील मुस्लिम मोहल्ला परिसरात राहणाऱ्या सकलेन नासिर आतार याचा वाढदिवस साजरा करत असताना काही युवकांनी बेकायदेशीर पणे एकत्र येऊन सकलेन आतार याच्यावर अंडी फेकून मारत बीभत्स वर्तणूक केली. याशिवाय या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण करून काही युवकांनी आपल्या स्टेटसवर व सोशल मीडियावर अंडी मारत असलेल्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल केला.

अशाप्रकारे विचित्र पद्धतीने वाढदिवस साजरा करणाऱ्या घटनेचा निषेध करत या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण नारायणगाव येथील बजरंग दलाचे कृष्णा माने तसेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रसारित केले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नारायणगाव पोलिसांनी मुस्लिम मोहल्ला येथील सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

सोशल डिस्टंसिंग चे पालन न करता सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाढदिवस साजरा केल्यामुळे आरोपी सकलेन नासिर आतार, साकिर आमीन जमादार, आरमान खालीद शेख, मोईन एकलाक आतार, मोसीन फिरोज ईनामदार, जाहीद पिर महम्मद पटेल (सर्व राहणार मुस्लिम मोहल्ला, नारायणगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करून नारायणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नारायणगाव पोलीस स्थानकात भा.द.वि. कलम १८८,२६९, २७० आ. व्य. २००५ चे कलम ५१ (२), कोवीड – १९ उपाय योजना २०२० कलम २,३,४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सचिन कैलास कोबल यांनी दिली. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार टाव्हरे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *