वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या लॉजवर नारायणगाव पोलिसांची कारवाई

तीन जणांना अटक

नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
नारायणगाव (ता. जुन्नर) बसस्थानकासमोरील विश्वनाथ लॉज वर बेकायदा सुरू असलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी कारवाई करून तीन जणांना ताब्यात घेतले. यावेळी दोन पीडित महिलांची सुटका पोलिसांनी केली.

ही घटना आज बुधवार दिनांक २ रोजी घडली. या घटनेतील आरोपी अशोक हृदयनारायण तिवारी, गौरव अशोक तिवारी (दोघेही राहणार नारायणगाव) व कैलास नामदेव वाबळे (राहणार वडगाव सहानी) यांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नारायणगाव येथील बसस्थानकासमोरील विश्वनाथ लॉजवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची खबर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी विभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांना याविषयी माहिती दिली. याच अनुषंगाने विभागीय पोलीस अधिकारी जावळे यांनी नारायणगाव पोलीस स्थानकात छापा कारवाईसाठी पोलीस कर्मचारी पंच व बनावट गिराईक यांना योग्य ते मार्गदर्शन करून पुढील कारवाईसाठी रवाना केले.

काही वेळातच विश्वनाथ लॉजवर जाऊन बनावट गिराईक पाठवून वेश्या व्यवसायासाठी मुलीची मागणी केली. त्यानुसार कैलास वाबळे यांनी महिला पुरवून त्यांचेकडून लॉजचे चालक अशोक तिवारी, गौरव तिवारी यांनी एक हजार रुपये रोख रक्कम स्वीकारली. यावेळी लागलीच उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व पोलिसांनी तेथे छापा टाकून दोन महिलांना ताब्यात घेतले. लॉजचे चालक अशोक तिवारी, गौरव तिवारी व कैलास नामदेव वाबळे यांच्याविरुद्ध पिटा व प्रचलित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक हिंगे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल योगेश गारगोटे यांनी दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *