कामगारनेते उपमहापौर केशव घोळवे यांची गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती

बातमीदार: रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी : (दि. 12 नोव्हेंबर 2020) कामगार कार्यकर्ता ते कामगार नगरीचा उपमहापौर होण्याचा सन्मान मिळविणारे केशव घोळवे यांची गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती चव्हाण यांनी आकुर्डी येथे झालेल्या बैठकीत घोळवे यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित केले. तसेच यावेळी संस्थेच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेचे अध्यक्ष म्हणून मुलाणी मोहम्मद शरीफ पापाभाई आणि पुणे शहर अध्यक्ष महादेव गोविंद धर्मे यांचीही डॉ. भारती चव्हाण यांनी नियुक्ती केली. यावेळी राज अहेरराव, तानाजी एकोंडे, राजेश हजारे, संजय गोळे, भरत शिंदे, गोरकनाथ वाघमारे, शिवाजीराव शिर्के, श्रीकांत जोगदंड, कल्पना भाईंगडे आदी उपस्थित होते.

केशव घोळवे यांचा कामगार कार्यकर्ता ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर असा प्रेरणादायी राजकीय प्रवास कामगार क्षेत्रामध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. केशव घोळवे यांनी उपमहापौर पदावर विराजमान होताच पहिल्याच दिवशी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत असणा-या स्मशानभूमीमध्ये असणा-या ठेकेदारी पध्दतीने काम करणा-या कर्मचा-यांना कायम सेवेत घेण्याचे काम केले. तसेच अनेक वर्षांपासून शहरामध्ये कचरा सफाईचे काम करणा-या घंटागाडी कर्मचा-यांना डबल दिवाळी बोनस देऊन आपण कामगारांप्रती संवेदनशील असल्याचे दाखवून दिले. घोळवे यांनी शिवशंभो प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरात सामाजिक कार्य करीत असताना थरमॅक्स कंपनीच्या युनियनचे सलग पंधरा वर्ष अध्यक्षपद भूषविले आहे. श्रमिक एकता महासंघाच्या सरचिटणीस पदावर काम करीत असताना त्यांनी कामगारांचा आवाज आयएलओ या (इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायजेशन) जागतिक कामगार परिषदेत पोहचविला आहे. सध्या ते भाजप कामगार आघाडीच्या महाराष्ट्र पोलिस सरचिटणीस पदावर आणि महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी संघटीत असंघटीत कामगारांना किमान वेतन मिळण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

संस्थेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झालेले मुलाणी हे 2007 चे गुणवंत कामगार असून टाटा मोटर्समध्ये नोकरीस आहेत. पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती झालेले धर्मे हे किर्लोस्कर न्यमॅटीक या कंपनीतून सेवानिवृत्त झाले असून 2000 मध्ये त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या तीनही कामगारांच्या नियुक्तीमुळे शहर व जिल्ह्यातील कामगार क्षेत्रामध्ये आंनदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *