उपमहापौर पदाची माळ कामगार नेते केशव घोळवे यांच्या गळ्यात पडणार ?

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी दि २ नोव्हेंम्बर, उपमहापौरपदासाठी मोरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे केशव घोळवे यांचे नाव निश्चित झाल्याचे अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. सर्वांशी सलोख्याने वागणारे, शांत , संयमी, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे केशव घोळवे यांचे नाव भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजाविली आहे. दरम्यान, पुन्हा पिंपरी मतदारसंघातच पद जाणार आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांना हा धक्का दिल्याचे मानले जात आहे.

माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी १४ ऑक्टोबर २०२० रोजी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा का घेतला याचे खरे कारण पण गुलदस्त्यातच असल्याच्या चर्चा शहरात आहे. त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे उपमहापौरपद रिक्त झाले आहे. त्या जागी त्यांच्याच प्रभागातील घोळवे यांची निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे.

उपमहापौरपदासाठी आज दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज दाखल करायचे आहेत. भाजपमधील गोपीनाथ मुंडे गटाने उपमहापौरपद मिळविण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती.

पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमहापौरपदासाठी घोळवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.

केशव घोळवे यांची कामगार नेते अशी ओळख आहे. संभाजीनगर, शाहूनगर, मोरवाडी प्रभागातून ते २०१७ च्या निवडणुकीत भाजपकडून निवडून आले आहेत. पहिल्यांदाच ते निवडून आले आहेत. त्यांचे पक्षातील सर्वच नेत्यांचे सलोख्याचे संबंध आहे.

असे असले तरी राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चितता असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *