महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला…..शारदा मुंडे समता परिषदेचा पिंपरीत वर्धापनदिन साजरा

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी (दि. 1 नोव्हेंबर 2020) महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुणे शहरात कर्मट सनातनी व्यवस्थेविरुध्द लढा उभारुन स्त्री शिक्षणाचा पाया रचला. त्यांच्या नावाने 1992 साली स्थापना झालेल्या महात्मा फुले समता परिषद या सेवाभावी संस्थेने आज वर्धापन दिनानिमित्त एक गरजू कुटूंबातील दोन्ही मुलांचा शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली हा उपक्रम इतरांना अनुकरणीय आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शारदा मुंडे यांनी केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहर शाखेच्या वतीने रविवारी (दि. 1 नोव्हेंबर) पिंपरीतील महात्मा फुले पुतळा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात मुंडे बोलत होत्या. यावेळी समता परिषदेचे शहराध्यक्ष ॲड. चंद्रशेखर भुजबळ, पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, कॉंग्रेस पक्षाच्या महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, राजेंद्र करपे, विशाल जाधव, सुरेश गायकवाड, इंदूताई घनवट, योगेश हिंगणे, वंदना जाधव, ज्ञानेश्वर मोंढे, पांडूरंग महाजन, भारत भोसले, मीना मोहिते, राजू फुले, महेश भागवत, सुरज ताम्हाणे, विशाल शिंदे, प्रसाद कुदळे, चैतन्य भुजबळ आदी उपस्थित होते.

बेलसर, तालुका पुरंधर येथील रहिवासी व महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते सुनिल मोतीराम जगताप यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्यांचा मुलगा अजिंक्य आणि मुलगी साक्षी यांचा पुढील उच्चं शिक्षणापर्यंतचा सर्व शैक्षणिक खर्च समता परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे अॅड. चंद्रशेखर भुजबळ यांनी सांगितले. तसेच श्रीमती आशा सुनिल जगताप यांच्याकडे धनादेश देण्यात आला. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे यांनीही धनादेश व उपस्थितांनी रोख रक्कम दिली.
शारदा मुंडे पुढे म्हणाल्या की, विद्ये विना मती गेली। मती विना निती गेली।। निती विना वित्त गेले। वित्त विना क्षुद्र खचले।। एवढे अनर्थ एका अविद्येने केले।। सर्व मुला – मुलींनी शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी फुले दांपत्यांनी आपले जीवन पणास लावले. दगड, धोंडे, शेणाचे गोळे यांचा मारा सहन करत सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या बरोबर पुण्यात भिडेवाडा येथे देशातील पहिली मुलींची शाळा काढली. आज देशभरात सर्वच क्षेत्रात मुलांच्या बरोबरीने व काही क्षेत्रांत मुलांच्या पुढे मुलींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना आदर्श मानून ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी 1992 साली महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. फुले दांपत्यांचे कार्य आणि विचार तळागाळातील समाजापर्यंत पोहचविण्याचे काम अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद करीत आहे. तसेच गरजू, गरीबांना मदतीचा हात देत आहे. पिंपरी चिंचवड समता परिषदेने जगताप कुटूंबियांना दिलेली मदत व पुढील शिक्षणाची घेतलेली जबाबदारी हे कार्य इतर संस्था, संघटनांना प्रेरणादायी आहे असेही शारदा मुंडे म्हणाल्या.

स्वागत, प्रास्तविक अॅड. चंद्रशेखर भुजबळ, सुत्रसंचालन राजेंद्र करपे आणि आभार भारत भोसले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *