कामगार तथा उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

नारायणगाव (किरण वाजगे)
राज्याचे कामगार तथा उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतची माहिती वळसे पाटील यांनी स्वतः ट्‌विट करून दिली आहे. उद्या शुक्रवारी (ता. ३० ऑक्‍टोबर) त्यांचा वाढदिवस आहे. 

दरम्यान कोरोना विषाणूची लागण झालेले रुग्ण दिवसेंदिवस कमी होत असताना राज्याच्या मंत्रिमंडळातील दहा ते बारा मंत्र्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही समावेश आहे. 

दिलीप वळसे पाटील आज सकाळी मंत्रालयात हजर होते. कॅबिनेट बैठक सुरू होण्याआधी त्यांच्या कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील घरी गेले. 

वळसे पाटील यांनी केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे की, नुकतीच माझी कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. माझी प्रकृती उत्तम असून मला कोणताही त्रास नाही. खबरदारी म्हणून मी डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वाद यांच्या बळावर मी लवकरात लवकर पुन्हा आपल्या सेवेत उपस्थित होईन,
याच पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील कोरोना विषाणूची लागण झालेली आहे.

या सर्वांमधील उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे रुग्णालयात उपचार घेत असून इतर सर्व मंत्र्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. हे सर्व मंत्री राज्य मंत्रिमडळात कार्यरत आहेत.