कारच्या काचा फोडून चोरी करत महाराष्ट्र व गोवा राज्यात धुमाकूळ घालणारी टोळी पिंपरी चिंचवड युनिट 4 कडून अटक

बातमीदार : रोहित खर्गे, विभागीय संपादक

पिंपरी चिंचवड: दि २९ ऑक्टोबर
६ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० ते २.४५ चे दरम्यान बेंगलोर मुंबई हायवेवर सर्व्हिस रोडवर बिटवाईज कंपनी जवळ रोडवर फिर्यादी मिलिंद वेदव्यास राळेगावकर, वय ४८ वर्ष, धंदा- बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर रा. सुसगाव, पुणे यांनी त्यांची होंडा सिटी कार लॉक व पार्क करून ठेवली असताना अज्ञात इसमांनी सदर गाडीची काच फोडून मागील सीटवर ठेवलेली रोख रक्कम ५००००रु असलेली बॅग चोरून नेल्याने हिंजवडी पोलीस ठाणे गु.र. नंबर ५४०/ २०२० भा. दं. वि. कलम – ३७९, ४२७ प्रमाने गुन्हा दाखल होता.

मागील एक ते दीड वर्षात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत गाड्यांच्या काचा फोडून होणाऱ्यां चोऱ्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडल्याने माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सुधीर हिरेमठ यांनी सर्व गुन्हे शाखेचे अधिकारी यांना या प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करून घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे गुन्हे शाखा युनिट ४, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ४ चे अधिकारी व अंमलदारांनी सदर गुन्ह्याचा तपास सुरू केला असता वासुदेव मुंढे , आदिनाथ ओंबासे यांनी सदर कंपनीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता गुन्हे झाले वेळी सदर परिसरात एक संशयित मोटरसायकल फिरत असल्याचे आढळून आले. तेव्हा सदर स्टाफने सीसीटीव्ही द्वारे बरेच अंतर सदर मोटर सायकलचा माग काढून अंदाजे १०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासून मोटारसायकलचा नंबर निष्पन्न केला. सदर क्रमांकाद्वारे मोटरसायकल धारकाचा शोध घेतला असता सदरची मोटरसायकल ही आरोपी गणेश उर्फ नाना माणिक पवार हा वापरत असल्याची व मुंबई येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांनी पथकासह जाऊन त्यास रबाळे नवी मुंबई परिसरातून ताब्यात घेतले.