मोशीतील कचऱ्याचे डोंगर हटवण्यासाठी आमदार लांडगे आक्रमक

  • महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासोबत बैठक
  • वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाचा घेतला आढावा

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील गेले २० ते २५ वर्षांपासून जमा झालेला कचारा मोशी डेपोवर टाकण्यात आला आहे. याठिकाणी कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्यासाठी ठोस उपाययोजना करा. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती प्रकल्प तात्काळ मार्गी लावावा, अशी आग्रही मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाबाबत सोमवारी महापालिका भवनात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर तसेच माजी महापौर राहुल जाधव, नितीन काळजे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत मोशीत होणारे कचऱ्याचे डोंगर आणि कचरा व्यवस्थापनाअभावी निर्माण झालेली जागेची समस्या याबाबत आमदार लांडगे यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.

मोशी, चऱ्होली तसेच भोसरी परिसरात नागरिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचऱ्याचे डोंगर वर्षानुवर्षे साचलेले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरते आहे. सध्या निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा आपल्याकडे आहे. पण, पूर्वीच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासन कोणती कार्यवाही करते? असा प्रश्न आमदार लांडगे यांनी उपस्थित केला.

आमदार लांडगे म्हणाले की, मोशी येथील कचरा डेपोवर गेल्या २० ते २५ वर्षांपासून कचारा टाकला जातो. सध्यस्थितीला शहरातून दैनंदिन सुमारे १ हजार ५० टन कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाने २०१९ मध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाची क्षमता दैनंदिन १ हजार टन इतकी आहे. त्यामुळे पूर्वी टाकलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य आहे. मात्र, प्रशासन कार्यवाही करीत नाही, अशी नाराजी लांडगे यांनी व्यक्त केली.

…अशी आहे प्रशासनाची भूमिका?
सध्याच्या कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर इनर्ट टाकरण्यासाठी एसएलएफ- २ चा वापर सुरू केला आहे. मात्र, यापूर्वीच्या वापरातील एसएलएफ- १ ची क्षमता संपली आहे. तसेच, एसएलएफ- २ ची जागाही नजिकच्या काळात संपणार आहे. परिणामी, भविष्यात कचऱ्याचा विघटनाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे कॅपिंग आणि एसएलएफ- १ च्या जागेचा कचरा विघटनासाठी पुन:श्च वापर करण्याकामी जुन्या कचऱ्याचे बायोमायनिंग करता येईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली.

हॉटेल वेस्टमधून बायोगॅस निर्मितीसाठी पुढाकार…
पिंपरी-चिंचवडमध्ये निर्माण होणारे हॉटेल वेस्ट तसेच ओला कचरा संकलित करुन त्याद्वारे बायोगॅस निर्मिती करावी. याकरिता महापालिका प्रशासनाने कार्यवाही केली होती. मात्र, याबाबत काढलेली निविदा प्रक्रिया तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आली. शहरातून सध्यस्थितीला ४० ते ५० टन ओला कचरा संकलित केला जातो. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोगॅस निर्मिती प्रकल्प ‘डीबीओटी’ तत्त्वावर प्रकल्प उभारणे प्रस्तावित आहे. याबाबत पुन्हा निविदा प्रक्रिया राबवून प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *