एमपीएससी परीक्षार्थींच्या प्रश्नांसाठी नीता ढमालेंनी घेतली खासदार छत्रपती संभाजीराजेंची भेट

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील प्रबळ उमेदवार नीता ढमाले यांनी पुण्यामध्ये खासदार संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेऊन त्यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या सामंजस्यपूर्ण भूमिकेला आपला पाठींबा दिला. तसेच एमपीएससी परीक्षार्थींच्या विविध प्रश्नांबाबत त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.

११ ऑक्टोबर रोजी राज्यात एमपीएससीची राज्यसेवा परीक्षा होणार असुन १० ऑक्टोबर रोजी मराठा समाजाच्या वतीने राज्यात “महाराष्ट्र बंद”चे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दीड वर्षांपासून परीक्षार्थी या परीक्षेची तयार करत आहेत. परंतु महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर परीक्षेला सामोरे जाण्याबाबत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण असल्याचे ढमाले यांनी सांगितले.

कोरोनामुळे राज्यातील सार्वजनिक व खाजगी वाहतूक व्यवस्था अद्याप पूर्णपणे सुरु झाली नाही. त्यामुळे परीक्षेसाठी ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी अगोदरच आपापल्या परिक्षाकेंद्र असणाऱ्या शहरात येतील असे चित्र आहे. परंतु महाराष्ट्र बंदमुळे वाहतूक व्यवस्था, हॉटेल्स वगैरे बंद राहिल्यास बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसून अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीराजेंच्या शब्दाला महाराष्ट्रात मान असुन त्यांनी अधिकारवाणीने मराठा आंदोलकांना आवाहन केल्यास हा बंद पुढे ढकलता येऊ शकतो. असे झाल्यास एमपीएससी परिक्षार्थींचे नुकसान टाळता येईल. सोबतच मराठा समाजातील अनेक परीक्षार्थी विद्यार्थीही या बंदमध्ये सहभागी होऊन या बंदला व्यापक स्वरुप मिळेल. यासोबतच मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर शासनभरतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे, त्याविषयी संभाजीराजेंनी शासनस्तरावर योग्य तो समन्वय साधून सर्व जातीधर्माच्या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळवून द्यावा अशीही विनंती ढमाले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *