उत्तरप्रदेशमध्ये आता कायद्याचं राज्य राहिलं नाही – नवाब मलिक

बातमीदार: रोहित खर्गे, विभागीय संपादक

पंतप्रधानांना हाथरसप्रकरणी दु:ख झाले असेल तर योगींचा राजीनामा घेऊन सरकार बरखास्त करावं…

मुंबई दि. ३० सप्टेंबर – उत्तरप्रदेशमध्ये आता कायद्याचं राज्य राहिलं नाही तर योगींच्या खास लोकांचं राज्य आलं आहे. योगी हे महाराज आहेत परंतु राज्य राजासारखं चालवत असून हे लोकशाहीला घातक आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी योगी आदित्यनाथ यांचा समाचार घेतला आहे.

उत्तरप्रदेशमध्ये योगीजी ज्यापध्दतीने सरकार चालवत आहेत यावरून ते त्यांच्या सहकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना खुली सुट देत आहेत. हाथरसमध्ये दलित बालिकेवर सामुहिक बलात्कार झाला. त्यानंतर तिची हत्या झाली. सुरुवातीला फेक न्यूज आहे असं काही घडलंच नाही म्हणणार्‍या योगी सरकारने त्या बालिकेवर रातोरात अंत्यसंस्कार का केले. यातून स्पष्ट होते की उत्तरप्रदेशमध्ये कायद्याचं राज्य राहिलेले नाही असेही नवाब मलिक म्हणाले.

उन्नावमध्ये सेंगरला वाचवण्याचा प्रयत्न झाला तसा या केसमध्ये आणि यासारख्या अनेक केसेस उत्तरप्रदेशमध्ये आहेत. ज्यांना सरकार वागणूक देत आहे असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

दरम्यान हाथरसप्रकरणी पंतप्रधानांना दु:ख झाले असेल तर योगींचा तात्काळ राजीनामा घेवून सरकार बरखास्त करावे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *