भांडवलदार व उद्योगपतीच्या माध्यमातून शेतकरी नागवला जाऊ शकतो – मानव कांबळे अध्यक्ष स्वराज्य अभियान

बातमीदार : रोहित खर्गे (विभागीय संपादक)

पुणे : दि २५ सप्टेंबर २०२०
स्वराज इंडिया पार्टी स्वराज अभियानच्या वतीने शेतकरी विरोधी संसदेत पारित केलेल्या तीन कायद्याच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या कार्यालयासमोर निदर्शन आंदोलन करण्यात आले. यावेळी स्वराज्य अभियानचे महाराष्ट्राचे अध्यक्ष मानव कांबळे, इब्राहीम खान, प्रदीप पवार राष्ट्रीय जनआंदोल समन्वयाच्या नेत्या सुनीती सु.र. व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर उपस्थित होते.

हा कायदा शेतकरीविरोधी असून भांडवलदार उद्योगपतींच्या हिताचा आहे. याचा गंभीर परिणाम शेती व शेती पूरक व्यवसायावर होणार असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसू शकतो. यामध्ये भांडवलदार उद्योगपतीच्या माध्यमातून शेतकरी नागवला जाऊ शकतो. सरकार यामध्ये पलायनवादी भूमिकेत असून शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भावाच्या बाबत कुठली हमी या कायद्यात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना उद्योगपती व भांडवलदारांच्या दावणीला बांधून त्यांची लूट करण्याची कायदेशीर मुभा मिळणार आहे.

गोरगरिबांची अन्नसुरक्षा धोक्यात येणार आहे. हा कायदा राज्यसभेत लोकशाही संकेत पायदळी तुडवून पाशवी बहुमताच्या जोरावर कुठलीही चर्चा न करता आवाजी मतदानाने द्वारे पारित केला आहे. त्यामुळे या काळया कायद्याच्या विरोधात तमाम शेतकरी वर्ग असून हा कायदा महामहिम राष्ट्रपती मा.रामनाथजी कोविंद यांच्या स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतिभवनात गेला असून त्यावर महामहिम राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करू नये अशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी पुणे यांच्या माध्यमातून मा.राष्ट्रपतींना पाठवण्यात आले आहे.